Vanchit News

नागपूर - रत्नागिरी महामार्ग जमिन अधिग्रहण संबंधी तातडीने बैठक घ्यावी.



वंचित न्युज चैनल:- कोकण विभाग प्रमुख :- सखाराम कांबळे. तारीख :- 21/6/2024. नागपूर ते रत्नागिरी महामार्गाच्या चालू असलेल्या कामासाठी अधिग्रहीत जमिनीचा मोबदला ४ पटीने मिळालेला असताना याच महामार्गाला सध्या शिरोळ व हातकणंगले मतदारसंघात सुरु होणाऱ्या कामाला फक्त २ पटीने भरपाई मिळणार असल्याने यामध्ये शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे. अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी, विहिरी या रस्त्याच्या कामात गेल्या असून शेतकऱ्यांच्यावर मोठ्या प्रमाणात अन्याय होणार आहे, त्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणी सोडवण्याकरिता संबंधित विभागाची बैठक आयोजित करून शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा,अशी मागणी शिरोळ तालुक्याचे आमदार डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनात म्हटले आहे की, सध्या नागपूर ते रत्नागिरी महामार्गाचे काम चालू आहे. त्यामध्ये सांगली जिल्ह्यातील अंकली पासून ते कोल्हापूर जिल्ह्यातील चोकाक पर्यंतचे काम बंद आहे. परंतू अपूर्ण असलेल्या महामार्गाच्या या कामाचे दि. २७ डिसेंबर २०२३ रोजी भारत राज्यपत्र प्रकाशित झालेले आहे. या रस्त्याच्या कामाकरीता शिरोळ व हातकणंगले मतदारसंघातील जमीन अधिग्रहणाचे काम चालू असून यासंबंधी अनेक शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात तक्रारी नोंदविल्या आहेत. कारण सध्या चालू असलेल्या कामासाठी अधिग्रहीत जमिनीचा मोबदला याच महामार्गासाठी ४ पटीने मिळालेला असताना याच महामार्गाला सध्या शिरोळ व हातकणंगले मतदारसंघात सुरु होणाऱ्या कामाला २ पटीने भरपाई मिळणार आहे. तरी ही बाब संबंधीत शेतकऱ्यांच्यावरती मोठ्या प्रमाणात अन्याय करणारी आहे. तरी या बाबतीत आपण शेतकऱ्यांच्या अडचणी सोडविणेकरीता संबंधीत विभागाची बैठक आयोजित करावी, ही विनंती केली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संबंधित विभागाला सूचना देवून तातडीने याप्रश्नी बैठक आयोजित करण्याचे आदेश दिले. यावेळी जयसिंगपूरचे माजी नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर उपस्थित होते.






Vanchit News