कायद्यामध्ये करण्यात आलेले बदल समजून घ्यावेत आणि त्याचे पालन करावे-पोलीस निरीक्षक विश्वास पाटील यांचे आवाहन.
वंचित न्युज चॅनेल:- सह संपादक :- श्रीरंग कांबळे. तारीख :- 7/7/2024 चंदगड / कोल्हापूर ब्रिटिशांनी तयार केलेल्या, कालबाह्य झालेल्या कायद्यामध्ये बदल केला असून नवीन कायदे उद्याच्या सुजाण तरुणांनी समजून घेऊन त्याची अमलबजावणी करावी असे आवाहन चंदगड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विश्वास पाटील यांनी केले.चंदगड येथील र.भा.माडखोलकर महाविद्यालयात आयोजित " नव्या कायद्याची जनजागृती " या विषयावर ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.एस.डी. गोरल होते. ब्रिटिशांनी भारतीय जनतेला गुलाम बनवण्यासाठी अमानुश असे कायदे केले होते.तेच कायदे स्वातंत्र्यानंतरही कमीअधिक प्रमाणात अस्तित्वात होते. त्यामुळे नागरिकांवर अन्याय होत होता.गुलामीचे प्रतीक असलेले हे कायदे १ जुलै पासून बदलण्यात आले आहेत.जनतेचे हित लक्षात घेऊन गुन्हेगारावर जरब बसवणारे हे नवीन कायदे लागू करण्यात आले आहेत.तरुणांनी या नव्या कायद्याचा अभ्यास करून समाजातील सृजनशील नागरिक बनण्याचा प्रयत्न करावा असे प्रतिपादनही यावेळी बोलताना पोलीस निरीक्षक विश्वास पाटील यांनी केले. अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ.एस.डी.गोरल यांनी विद्यार्थी हा उद्याचा जागरूक नागरिक झाला पाहिजे त्यासाठी त्याने नवीन कायदे समजून घ्यावेत.या बदलेल्या कायद्याची जनजागृती विद्यार्थ्यांनी गावोगावी जाऊन करावी असे आवाहन केले. प्रास्ताविक,खेडूत प्राध्यापक प्रबोधिनीचे प्रमुख,प्रा.ए.डी. कांबळे यांनी केले.यावेळी बेळगाव येथील राणी चन्नम्मा विद्यापीठाच्या हिंदी अभ्यासक्रम निवड समितीवर प्रा.डॉ.एस.एन. पाटील यांची निवड झाल्याबद्दल पोलीस निरीक्षक विश्वास पाटील यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. तर प्रशासकीय सेवक नंदकुमार चांदेकर व अनिल पाटील यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. या दोघांनीही महाविद्यालय ग्रंथालयासाठी पुस्तके भेट दिली. आभार प्रा.सौ सरोजिनी दिवेकर यांनी मानले.यावेळी दिगंबर गायकवाड यांच्यासह महाविद्यालयातील बहुसंख्य प्राध्यापक प्रशासकीय कर्मचारी,व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.