पांचगणी पालिकेचे मुख्याधिकारी गिरीश दापकेकर यांच्यावर बाजारपेठेत काळे द्रव्य अंगावर टाकून हल्ला.
वंचित न्यूज चॅनल सातारा जिल्हा प्रतिनिधी : यतीन गोळे. दिनांक:-१२/१०/२०२२ . भिलार,ता.१३: पांचगणी गिरिस्थांन नगरपालिकेचे मुख्याधिकारी गिरीश दापकेकर यांच्यावर आज सकाळी बाजारातील स्वच्छतेबाबत पाहणी करत असताना बुधवार बाजारपेठेत काळे द्रव्य अंगावर टाकून हल्ला केल्याची घटना घडल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. याबाबत पांचगणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पांचगणी पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत. याबाबत पांचगणी पोलीस ठाण्यातून मिळालेली अधिक माहिती अशी की आज सकाळी मुख्याधिकारी गिरीश दापकेकर हे रोटरी क्लबच्या रक्तदान शिबिरात उपस्थित राहून त्यांनी रक्तदान ही केले. त्यानंतर आठवडा बाजारात राष्ट्रीय शहरी उपजीविका अभियानांतर्गत पथविक्रेते सर्वेक्षणाचे काम व बाजारातील स्वच्छता पाहणी करण्याचे कामासाठी मुख्याधिकारी यांचे बरोबर बांधकाम मुकादम सूर्यकांत कासुर्डे ,स्वच्छता निरीक्षक गणेश कासुर्डे , लिपिक रवींद्र कांबळे व सागर बगाडे शिवाजी चौकात आले. त्या ठिकाणाहून सर्वजण पथविक्रेते सर्वेक्षण तसेच बाजारातील स्वच्छतेबाबत पाहणी करत निघाले ते महात्मा फुले हायस्कूलचे जुनी इमारतीचे गेट जवळ पोहोचले असता अनमोल अशोक कांबळे (रा.पाचगणी) हा सर्वांचे समोर येऊन मुख्याधिकारी यांना अडवून मला नोटीस का काढणार आहात असे बोलून मुख्याधिकारी यांचा हात पकडुन धक्का देऊन खाली पाडून जखमी केले व त्याने त्याचे हातातील बाटलीमधील काळे द्रव्य अंगावर टाकून हल्ला केला. ही घटना वाऱ्यासारखी शहरात पसरताच सर्व पालिका कर्मचारी कार्यालयात जमा झाले. यावेळी काही काळ वातावरण तप्त झाले होते. त्यांनतर मुख्याधिकारी कर्मचाऱ्यांसमवेत पोलीस ठाण्यात गेले . कर्मचाऱ्यांनी नगरपालिकेचे काम बंद ठेवून सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश पवार यांना निवेदन देवून वारंवार कर्मचाऱ्यांना वेठीस धरणाऱ्या या नराधमामुळे कामकाज करणे असुरक्षित झाले आहे.तरी याचा तातडीने बंदोबस्त करावा व त्याचेवर कडक कारवाई करावी अशी मागणी केली. याबाबत मुख्याधिकारी गिरीश दापकेकर यांनी पांचगणी पोलीस ठाण्यात अनमोल कांबळे याचेविरोधात शासकीय कामांमध्ये अडथळा आणून हल्ला केलेबाबत गुन्हा दाखल केला असून पांचगणी पोलिसांचे पथक कांबळे याच्या शोधासाठी रवाना झाले आहेत. या घटनेचा अधिक तपास पांचगणी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पांचगणी पोलीस करीत आहेत. दरम्यान या घटनेची माहिती समजताच महाबळेश्वरच्या मुख्याधिकारी पल्लवी पाटील , वाईचे मुख्याधिकारी किरण मोरे यांचेबरोबरच पांचगणी शहर व परिसरातील व्यापारी, प्रतिष्ठित नागरिक हे पोलीस ठाण्यात दाखल झाले व या घटनेचा जाहीर निषेध करीत मुख्याधिकारी यांना दिलासा दिला.