Vanchit News

*महाबळेश्वर तालुक्यात अनाधिकृत बांधकामांवर जिल्हा प्रशासनाचा हातोडा ; भिलार, भौसे, खिंगर परिसरात पोलीस बंदोबस्तात कारवाई सुरू..*



पाचगणी : अति संवेदनशील क्षेत्र (इको सेन्सिटिव्ह झोन) म्हणून घोषित असणाऱ्या महाबळेश्वर तालुक्यात अनाधिकृत बांधकामे नेहमीच चर्चेचा विषय बनून राहिलेला आहे. भिलार,भोसे,खिंगर येथील अनाधिकृत बांधकामावर आज अचानक एकाच वेळी जिल्हा प्रशासनाने आज सकाळी साडेपाचच्या सुमारास हातोडा. पडला महाबळेश्वर तालुक्यातील पाच ठिकाणी ही कारवाई झाली असून यामध्ये भिलार येथील संकला, भोसे येथील प्रवीण छेडा, खिंगर येथील खंबाटा अशा बांधकामावर आज मोठ्या फौज फाट्यासह प्रसानाने बुलडोझर फिरवला आणि बांधकामे जमीनदोस्त करण्यात आली. जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांच्या मार्गदर्शनाखाली अनधिकृत बांधकामावर ही कारवाईची मोहीम आज पहाटे नियोजनबध्द रित्या सुरू झाली. यावेळी वाईचे प्रांताधिकारी राजेंद्रकुमार जाधव , महाबळेश्वर तहसीलदार तेजस्विनी पाटील , वाई तहसीलदार सोनाली मेटकरी, खंडाळा तहसीलदार विजय पाटील, महाबळेश्वर, पाचगणी नगरपालिकेचे कर्मचारी, वैद्यकीय टीम, महसूल अधिकारी तालुक्यातील सर्व मंडलअधिकारी व तलाठी आदी घटनास्थळी कारवाई वेळेस उपस्थित होते. या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त ही तैनात करण्यात आला होता.. दहा ते बारा जेसीबी आणि फॉकलन या मशिनच्या साह्याने अनधिकृत बांधकामाने उध्वस्त करण्याचे काम आज सकाळपासून चालू आहे. ही अनधिकृत बांधकामे पाडण्याची मोहीम नियोजनबध्द रित्या राबवली गेली. सर्व फौजफाटा काल पासूनच पांचगणीत दाखल झाला होता. त्यामुळे कारवाई होणार हे पक्के झाले होते. सकाळी कुणालाही समजण्याआधी पहाटेच सर्व यंत्रणा ठरलेल्या बांधकामांवर पोहोचली आणि अचानक या मोहिमेने वेग घेतला. आणि सकाळ होताच यातील काही बांधकामे जमिन दोस्त करण्यात आली. या मोहिमेची माहिती गुप्त ठेवण्यात आली होती. आज सकाळी पहाटे अचानक मोहीम सुरू करण्यात आली. त्यामुळे एकच गोंधळ उडाला होता. या विषयी अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न करण्यात आला मात्र अधिकाऱ्यांचे मोबाईल बंद असल्याचे निदर्शनास आल्याने माहिती मिळू शकली नाही.. या कारवाईने अनेक बांधकाम व्यवसायिक व बांधकाम मालक यांचे धाबे दणाणले आहेत. यामुळे स्थानिक भूमिपुत्र धास्तावले आहेत. तर ही कारवाई मोठ्या धनिकांवर होणार की, सामान्य नागरिकाना ही यात भरडले जाणार याबाबत चर्चा सुरू आहेत.






Vanchit News